दहशतवाद्याच्या बहिणीने गरळ ओकली   

माझा भाऊ धर्मयोद्धा

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त होत असताना आणखी एक चीड आणणारे वक्तव्य समोर येत आहे.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या एका दहशतवाद्याच्या बहिणीने माझा भाऊ मुजाहिदीन (धर्मयोद्धा) आहे, अशी दर्पोक्ती केली. या दहशतवाद्याचे घर शुक्रवारी पाडले.
 
पहलगाम हल्ला ‘लष्कर-ए-तैयबा’ या दहशतवादी संघटनेची शाखा असलेल्य ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या संघटनेने घडवला आहे. या हल्लेखोरांचा माग काढताना सुरक्षा दलांनी शुक्रवारी पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील एका दहशतवाद्याचे घर आणि अनंतनाग जिल्ह्यातील आदिल गुरी याचे घर जमीनदोस्त केले.
 
यातील त्रालमधील दहशतवाद्याच्या बहिणीने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना आपला भाऊ मुजाहिदीन आहे, असे म्हटले. ती म्हणाली, ‘माझा एक भाऊ कारागृहात आहे आणि दुसरा मुजाहिदीन आहे. मला दोन बहिणीही आहेत. मी काल सासरहून माहेरी आले, तेव्हा माझे आई-वडील किंवा भावंडे यापैकी कोणीच घरी दिसले नाहीत. पोलिस त्यांना घेऊन गेले होते.’
 
‘आमचे कुटुंब निरपराध आहे. मी घरी आले तेव्हा सुरक्षा दलांनी मला शेजाऱ्यांच्या घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी घरावर बॉम्बसारखे काहीतरी ठेवले. त्यानंतर घर जमीनदोस्त झाले,’ असे या महिलेने म्हटले आहे. सुरक्षा दलांनी शुक्रवारी अनंतनाग जिल्ह्यातील गुरी गावातील आदिल गुरी या दहशतवाद्याचे घरही उद्ध्वस्त केले. तोही पहलगाम हल्ल्यात सामील असल्याचा संशय आहे. त्याची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आदिलने पाकिस्तानात जाऊन प्रशिक्षण घेतले आहे.

‘जबर किंमत मोजावी लागेल’ : लष्कर प्रमुख 

‘पहलगाम हल्ल्यातील प्रत्येक दहशतवाद्याला शोधून काढू आणि त्यांना या नृशंस कृत्याची जबर किंमत मोजावी लागेल,’ असा इशारा जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिला.सिन्हा यांनी शुक्रवारी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासह लष्कराच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला. या बैठकीत सिन्हा बोलत होते. ही बैठक सुमारे तासभर चालली. आपल्या देशाचे लष्कर, पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दल यांच्या शौर्यावर धाडसावर पूर्ण देशाचा विश्वास आहे. या सर्व सुरक्षा यंत्रणांना समन्वयाने काम करून हल्लेखोरांना आणि त्यांना साह्य करणाऱ्यांनाही शोधून काढावे. या सर्वांची साखळीच कायमस्वरूपी उद्ध्वस्त करून टाकावी,’ असे सिन्हा म्हणाले.

दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई : राष्ट्रीय मानवी हक्क आयोग

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने शुक्रवारी पहलगाम येथील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. ‘पहलगाम हल्ल्याची बातमी वाचून धक्का बसला. दहशतवाद्यांना पाठबळ देणारे, मदत करणारे, समर्थन करणारे आणि दहशतवादी कारवाया करणारे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची वेळ आता आली आहे,’ असे आयोगाने म्हटले आहे.
 

Related Articles